Ad will apear here
Next
आठवणी दिवाळीचा फराळ बनवण्याच्या...


दिवाळीच्या आधी घरी फराळाचे पदार्थ तयार करण्याचा साग्रसंगीत सोहळा आता चाळिशीच्या आसपास असलेल्या मंडळींनी त्यांच्या बालपणी अनुभवला आहे. त्याबद्दलचे स्मरणरंजन केले आहे मुंबईतील सीए केदार साखरदांडे यांनी.... आठवणीतली दिवाळी या लेखमालेत...
..........
दिवाळी म्हटले की माझ्या डोळ्यासमोर येतो तो फराळ. लाडू, चिवडा, चकली, शेव आणि काय काय... मी लहान असताना माझी आई घरीच सगळा फराळ बनवायची. तेव्हाची तिची तयारीची गडबड, फराळ तयार होताना येणारा खमंग, गोड सुवास आजही मनात दरवळतो. आता माझी लेक लहान आहे. थोड्याफार प्रमाणात आम्ही घरी फराळ बनवत असल्याने ती ही हे अनुभवते; पण माझ्या किंवा माझ्या पिढीतल्या (आता चाळिशीच्या आसपास असलेल्या) सर्वांना दिवाळीत घरी आई, आजी, काकू फराळ बनवतानाचे चित्र आठवत असेल. 

त्या काळी फराळ बनवण्यातली गंमतच काही न्यारी होती हं! दिवाळीच्या साधारण आठवडाभर आधी फराळासाठीचे जिन्नस म्हणजे बेसन लाडवांसाठी चणा डाळ आणि बेदाणा, रवा लाडवांकरिता बारीक रवा आणि साखर, चकल्यांसाठी भाजणी, शंकरपाळ्यांसाठी मैदा, करंजीसाठी सुके खोबरे, तेल असा कच्चा माल रेशनच्या दुकानातून अथवा सहकारी भांडारामधून आणला जाई. हे सामान मिळालेल्या दिवाळी बोनसमधून आणले जाई. चकल्यांचा धातूचा साचा माळ्यावरून खाली येई. तो आधी चिंच किंवा कोकम लावून लखलखीत केला जाई आणि मगच त्याला स्वयंपाकघरात प्रवेश मिळे. शंकरपाळे करण्यासाठी चक्र चमचा शोधला जाई. पाच किलोचा निळसर रंगाचा पोष्टमन तेलाचा आणि पिवळसर रंगाचा पामोलीन तेलाचा डबा आणला जाई. (ही दिवाळीची सर्वांत मोठी खरेदी असे आणि हे संपलेले रिकामे डबे पुढे कित्येक वर्षे टोस्ट, बिस्किटे ठेवण्यासाठी वापरात येत). 

अशी पूर्वतयारी झाली, की फराळ बनवण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होई. हा एक कौटुंबिक सोहळा असे. आईला चकल्या करताना मदत म्हणून साचा फिरवून आम्ही चकल्या कागदावर साच्यातून गाळून देत असू. आई थोडासा पिठाचा तुकडा समोरच्या तेलाच्या कढाईत सोडून तेल व्यवस्थित तापले आहे की नाही ते बघत असे. तेल व्यवस्थित तापल्यावर साच्यातून काढलेल्या चकल्या तेलात सोडल्या जात आणि त्यातून चर्रर्र असा सुंदरसा आवाज येत असे. तळलेल्या चकल्या एका सुपात, पेपरावर पसरल्या जात. चव बघण्यासाठी बऱ्याच चकल्यांचा फन्ना पडत असे. सगळ्या चकल्या झाल्या, की डालडा अथवा पोष्टमनच्या मागच्या वर्षीच्या डब्यात ठेवल्या जात. 

पहिला दिवस तिखटाचा झाल्यावर दुसरा दिवस गोडाचा म्हणजेच बेसन लाडवाचा असे. हरभरा डाळ व्यवस्थित दळून आणली जाई. ते बेसन भरपूर तूप घालून खरपूस भाजले जाई. त्या वेळी येणारा सुगंध माझ्या दृष्टीने जगातील सर्वांत सुंदर सुगंध आहे. बेसन व्यवस्थित भाजले गेलेय का, याची पडताळणी शेजाऱ्यांना विचारून केली जाई आणि त्यांनी ‘सर्टिफाय’ केल्यानंतरच लाडू वळायला घेतले जात. वळलेल्या लाडवांवर बेदाणे खोवायचे काम आम्हा मुलांकडे असे. हा बेदाणा खोवलेला बेसन लाडू नुकतीच आंघोळ घालून, धूप देऊन काजळ लावलेल्या तान्ह्या गुटगुटीत बाळासारखा सुंदर दिसत असे. 

तिसरा दिवस हा शंकरपाळे करण्याचा. गोड पाण्यात भिजवलेल्या मैद्याचे गोळे पोळपाटावर लाटले जात आणि मग त्यावर चक्र (चिरणे) फिरवले जाई आणि त्याचे सुंदरसे तुकडे पडत. ते गरम तेलात सोडले जात. तेलात सोडताना येणारा आवाज चर्र.. असला तरी चकलीवेळी येणाऱ्या आवाजापेक्षा थोडा मृदू असे. 

दोन दिवस गोडाचे झाल्यावर चौथा दिवस पुन्हा तिखटाचा म्हणजे चिवड्याचा. हिरव्या मिरच्या आणि सुक्या खोबऱ्याच्या कातळ्या तेलावर भाजल्या जात. हे सर्व जिन्नस, भाजून फुलवलेले पातळ पोहे, मीठ, हळद यांना व्यवस्थित मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली जाई. हे सगळे संस्कार झाल्यावर चिवडारूपी फराळाचा समावेश त्यांच्या इतर भावा-बहिणीबरोबर केला जात असे. 

शेवटचा दिवस हा करंजीचा. खोबरे, साखर यांचे खमंग सारण, मैद्याच्या पारीवर पसरून ती पारी व्यवस्थित लखोटा बंद करावा तशी बंद केली जाई आणि हा बंद लखोटा गरम तेलाला सुपुर्द केला जाई आणि करंजीनामक एक सुंदर पाककृती तयार होत असे. 

असा हा फराळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी ताटात सजून पुढ्यात येत असे, तेव्हा त्याचा आस्वाद घेताना होणारा आनंद काही औरच असे. दिवाळी फराळ बनवण्याच्या आठवणींचे दिवस दर वर्षी नवा उत्साह देतात. दिवाळीचा आनंद वाढवतात. 

- केदार अनंत साखरदांडे, विलेपार्ले, मुंबई
ई-मेल : kedarsakhar@gmail.com

(लेखक सीए असून, त्यांचे ‘खिचडी’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.) 

(आठवणीतली दिवाळी या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZSHCF
Similar Posts
आठवण पावसाळी दिवाळीची! यंदा राज्यात अनेक ठिकाणी दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांत प्रचंड पाऊस पडला. आता पाऊस ओसरला असला, तरी वातावरण पावसाळीच आहे. अशाच एका दिवाळीत अवचित आलेल्या पावसामुळे मुंबईतील चाळीत काय दाणादाण उडाली होती, याच्या आठवणी लिहिल्या आहेत अभय वैद्य यांनी..
कधी तरी स्वत:साठी जगावं..... सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणूस इतका यांत्रिक झालाय की आजूबाजूचा निसर्ग, त्याचे सौंदर्य बघणंच विसरून गेलाय. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, आपल्या आवडीनिवडी जपाव्यात हेदेखील तो विसरून चाललाय. त्यामुळे प्रत्येकाचा जणू यंत्रमानव झालाय. यातून बाहेर पडून स्वतःसाठी जगायची गरज आहे...
आभाळाची छत्री... माझ्याकडे एक छत्री आहे. माझी आभाळाची छत्री.. गुलाबी रंगाची, लांब दांड्याची....या छत्रीला मी जसा विसंबत नाही, तशी छत्रीसुद्धा मला कधी विसंबत नाही...
कल हो ना हो.... काही गाणी तुम्हाला काही केल्या विसरता येत नाहीत. त्या गाण्याशी निगडित तुमच्या आठवणी नेहमी ताज्या रहातात. ते गाण जेंव्हा जेंव्हा तुम्ही ऐकता तेंव्हा तेंव्हा तुमचे मन भूतकालात जाते आणि त्या आठवणी जाग्या होतात पुन्हा.. पुन्हा.. परत... परत...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language